पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव माळवी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली आहे. गावातील तेरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपप्रणीत जनसेवा पॅनलविरुद्ध महाविकास आघाडीप्रणीत परिवर्तन ग्रामविकास पॅनल यांच्यामध्ये ‘कांटे की टक्कर’ होत आहे.
तेरा जागांपैकी तीन जागा बिनविरोध निवडून आल्या असून यामध्ये जनसेवा पॅनलला दोन, तर परिवर्तन पॅनलला एक जागा मिळाली आहे. उर्वरित दहा जागांसाठी विविध प्रभागांमध्ये कांटे की टक्कर दिसून येत असून उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. सत्ताधारी जनसेवा पॅनलचे नेतृत्व सरपंच सुभाष झिने, प्रतापराव झिने व प्रा. देवराम शिंदे करत असून विरोधी परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व माजी जि. प. बांधकाम समिती सभापती प्रा. रघुनाथ झिने करत आहेत. दोन्ही पॅनलकडून पाच वर्षे रखडलेले स्थानिक प्रश्न, विकासकामे, गटातटाचे राजकारण या मुद्द्यांचा प्रचारात वापर करण्यात येत आहे.