राहुरी : विखे कारखान्याने जशी गणेश कारखान्याची जबाबदारी घेतली, त्याच धर्तीवर तनपुरे कारखान्याचे पालकत्वही घेऊ, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी दिली.कारखाना सुरू करण्यासाठी शंभर कोटी रूपये पहिल्यांदा लागतील हे धाडस गृहित धरून आम्ही निवडणुकीत सामोरे जात आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तनपुरे साखर कारखाना निवडणुकीनिमित्त शनिवारी पहिल्या सभेत ते राहुरीत बोलत होते. कार्यकर्ते व सभासदांची मोठी गर्दी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. गणेश साखर कारखाना ज्याप्रमाणे सभासदांच्या मालकीचा राहिला, तोच पॅटर्न तनपुरे कारखान्यात राबविला जाईल, अशी ग्वाही विखे यांनी दिली़ कारखाना सुरू करण्यासाठी शंभर कोटी रूपये पहिल्यांदा लागतील हे धाडस गृहीत धरून आम्ही निवडणुकीत सामोरे जात आहोत़ विरोधकांचे सर्व ‘प्रताप’ माझ्याकडे असून, त्याचा वेळ आल्यावर पर्दाफास करू, असा टोला त्यांनी माजी खासदार प्रसाद तनपुरे व आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता लगावला.विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ़ सुजय विखे यांनी बिनविरोध फॉर्म्युल्याचा पुनरुच्चार केला़ बिनविरोध करण्यास आमची संमती आहे, मात्र त्यासाठी प्रत्येक मंडळाने जागेच्या वाटपानुसार कर्जाचा भार स्वत:वर घ्यावा़ कारखान्यावर असलेल्या कर्जाचा डोंगर लक्षात घेता १४० कोटी रूपये दिल्याशिवाय कारखाना चालू शकणार नाही़ कामगारांचे पगार, शेतकरी व बँकांची देणी लक्षात घेता दीर्घ कालावधीसाठी सहभागी तत्वावर कारखाना सुरू करू, अशी ग्वाही सुजय विखे यांनी दिली़जिल्हा परिषद सदस्य सुभाष पाटील, आऱ वाय़ तनपुरे, डॉ़ धनंजय मेहेत्रे, आसाराम ढूस, सुरेश करपे यांची भाषणे झाली़ कार्यक्रमास सोपानराव म्हसे, संपतराव धसाळ, तानाजी धसाळ, उत्तमराव म्हसे, डॉ़ जयंत कुलकर्णी, सुरेश येवले, ज्ञानदेव निमसे, उदयसिंह पाटील आदी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)मुळा-प्रवरा सहकारी सोसायटीचे पुनर्जीवन करण्याचे शासनाकडे प्रयत्न सुरू झाले आहेत़ सभासदांची दयनीय अवस्था लक्षात घेता पाठपुरावा केला जाईल़ मात्र त्यासाठी सभासदांकडून हमीपत्र अपेक्षित आहे. बिल भरण्याची व आकडे न टाकण्याची जबाबदारी सभासदांवर राहील़ संस्थेला ५६ कोटी रूपये मिळाले आहेत. त्यासाठी सातत्याने लढा द्यावा लागला़ कामगारांना लवकरच रक्कम दिली जाईल़- राधाकृष्ण विखे, विरोधी पक्ष नेते.
‘गणेश’ च्या धर्तीवर ‘तनपुरे’चेही पालकत्व घेऊ
By admin | Updated: May 28, 2016 23:41 IST