कर्जत: कर्जतचे ग्रामदैवत सदगुरु गोदड महाराज यांच्या रथयात्रा उत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. गोदड महाराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी हजेरी लावली. गोदडनाथा, भरपूर पाऊस येऊ दे, अशी प्रार्थना अनेक भाविकांनी केली. सदगुरु गोदड महाराज यांच्या रथयात्रा उत्सवानिमित्त मध्यरात्रीपासूनच भक्तांनी अभिषेक घालण्यास सुरुवात केली. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक होते. पोलीस दलाच्या वतीने अधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक भगवा ध्वज अर्पण केला. कर्जतचे तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी मानाची पूजा केली. रथयात्रेस दुपारी सुरुवात झाली. यावेळी सर्व मानकरी, सेवेकेरी उपस्थित होते. रथयात्रेनिमित्त गावोगावच्या दिंड्या कर्जतला आल्या आहेत. गोदडनाथांचा गजर करत रथयात्रेत सहभागी झाल्या आहेत. रथयात्रेसाठी भाविकांनी मोठी उपस्थिती लावली. एस.टी. महामंडळाने यात्रेसाठी बस न दिल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आश्रय घ्यावा लागला. गेल्या आठवड्यात झालेल्या मारामारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यांचा डोळा चुकवून भुरट्या चोरांनी अनेकांचे खिसे कापले, पाकीट मारले, मोबाईल चोरले.पाकिटमारांनी राजकीय नेत्यांच्या खिशात हात घालून हातसफाई केली. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)
भरपूर पाऊस येऊ दे...
By admin | Updated: July 23, 2014 00:18 IST