निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज येथे एक शेळी व कोकरावर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले. यामुळे परिसरात बिबट्याची पुन्हा दहशत वाढली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
निघोज येथे कन्हैया दूध डेअरीच्या पाठीमागे बबू आनंदा कवाद यांच्या शेतामध्ये ढवळपुरी येथील मेंढपाळ बुधा ठवरे व गणेश ठवरे यांच्या मेंढ्यांचा तळ बसला होता. शुक्रवारी रात्री एकदरम्यान बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून एक कोकरू व एक शेळी ठार केली. वनविभागाशी संपर्क साधल्यानंतर वनपाल जी. बी. वाघमारे, वनरक्षक टी. डी. पाडळे, पशुवैद्यकीय अधिकारी एस. बी. झावरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. उद्योजक बाबाजी तनपुरे, प्रा. ज्ञानेश्वर कवाद, संतोष शेटे, सतीश घुले, संतोष घुले, नवनाथ इरोळे आदींनी मेंढपाळांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.