अहमदनगर: महापालिका कार्यालयात उशिराने हजेरी लावणाऱ्या १३ कर्मचाऱ्यांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली़ वारंवार सूचना देऊन उशिराने हजेरी लावणाऱ्या कर्मचाऱ्यांची बिन पगारी करण्याचे आदेश उपायुक्त अजय चारठणकर यांनी दिले आहेत़ कारवाईत आस्थापना प्रमुखासह सहाय्यक नगर रचनाकारांचाही समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे़ महापालिकेचे उपायुक्त चारठणकर यांनी काही दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला़ पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली़ हजेरीच्यावेळी अनेकजण गैरहजर होते़ वेळेत कार्यालयात न येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ त्यामुळे त्यांनी यापुढे उशिराने आलेले खपवून घेणार नाही, अशी तंबी कर्मचाऱ्यांना दिली होती़ तसेच सर्व कर्मचाऱ्यांना वेळेत हजर राहण्याच्या तोंडी सूचना दिल्या होत्या़ मात्र मुजोर कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले़ उपायुक्त चारठणकर यांनी अचानक मंगळवारी ११़ २० वाजेच्या सुमारास अस्थापना विभागातील रजिस्टर मागविले़ ते तपासले असता अस्थापनाप्रमुखांची त्यात स्वाक्षरी नव्हती़ दस्तूरखुद्द आस्थापना प्रमुख अंबादास सोनावणे उशिराने कार्यालयात आल्याचे यावरून उघड झाले़ त्यामुळे चारठणकर चांगलेच संतापले़ त्यांनी वेळेत हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची बिन पगारी करण्याचे आदेश आस्थापनाप्रमुखांना दिले असून, कार्यालयातील १३ कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली़ यामध्ये आस्थापना प्रमुखासह १३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे़महापालिकेतील कर्मचारी या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात़ शहरातील नेत्यांच्या घरीदेखील कर्मचारी पाणी भरतात, असे सदस्य खासगीत बोलताना सांगतात़ मात्र अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई होत नाही़ राजकीय वरदहस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत प्रशासनही बोटचेपी भूमिका घेत असल्याचे बोलले जाते़नुकत्याच झालेल्या सभेतदेखील सदस्यांनी कर्मचारी काम करत नसल्याने प्रशासनास धारेवर धरले़ ही बाब गांभीर्याने घेत आयुक्त विजय कुलकर्णी यांनी कर्मचारी नाहीत, त्यामुळे अडचणी येत असल्याचा खुलासा केला़ नूतन उपायुक्त अजय चारठणकर यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. (प्रतिनिधी)यांच्यावर झाली कारवाईए़डी़ सोनावणे (आस्थापना प्रमुख)व्ही़एम़ जोशी (सहाय्यक नगररचनाकार)आऱजी़ म्हेत्रे (प्रकल्प प्रमुख)स्रेहल मुळे (कनिष्ठ लिपिक)ए़ एस़ काकडे (लिपिक)के ़बी़ वाघ ( लिपिक)व्ही़ डी़ गायकवाड (शिपाई)पी़ एम़ पावसे (शिपाई)एम़ एस़ गोंगे (शिपाई)व्ही़एस़ राणा(शिपाई)ए़ एस़ शेलार (शिपाई)रामदास होळकर (सुरक्षा रक्षक)़़
लेट लतिफांची बिनपगारी
By admin | Updated: March 9, 2023 10:59 IST