Ahilyanagar Crime: तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत तरूणाला सव्वादोन लाख रुपयांना लुटून लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने पलायन केले.
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील तरुणाचे जालना येथील रोशनी अशोक पवार नावाच्या मुलीसोबत लग्न लावून देण्याचे आमिष दाखविले गेले. मध्यस्थ ज्योती राजू गायकवाड (रा. छत्रपती संभाजीनगर) मार्फत रोशनीला दाखवण्यात आले. ८ ऑक्टोबरला चर्चा झाली आणि ११ ऑक्टोबरला लग्न झाले. लग्नापूर्वीच तरुणाकडून मध्यस्थांनी सव्वादोन लाख रूपये उकळले. लग्न झाल्यानंतर नवरी माहेगाव देशमुख येथे आली. पहिल्या रात्रीच पहाटे घरातील मंडळींची नजर चुकवून तिने पलायन केले.
याप्रकरणी तरुण व त्याच्या कुटुंबीयांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाणे गाठले आणि फिर्याद दिली. या फिर्यादीवरून रोशनी पवार, मध्यस्थ महिला ज्योती राजू गायकवाड व तीन पुरुष साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ ऑक्टोबर रोजी मध्यस्थ महिला ज्योती गायकवाड कोपरगावात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ज्योती गायकवाडला ताब्यात घेतले. तिला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
प्रलोभनाला बळी पडू नका
ज्योती गायकवाड व इतर आरोपींची नावे निष्पन्न करून पुढील कारवाई केली जाईल. सद्यस्थितीत तरुण व त्यांच्या घरची मंडळी लग्नासाठीच्या प्रलोभनाला बळी पडत आहेत. कोणतीही खातरजमा न करता, आर्थिक व्यवहार करून लग्न करण्यासाठी तयार होतात. प्रलोभनाला बळी पडू नका, असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी केले आहे.
Web Summary : In Kopargaon, a bride fled the second day of marriage after swindling ₹2.25 lakh. Police arrested a mediator involved in the fraud. Investigation continues.
Web Summary : कोपर्गाँव में शादी के दूसरे दिन दुल्हन ₹2.25 लाख लेकर फरार हो गई। पुलिस ने धोखाधड़ी में शामिल एक मध्यस्थ को गिरफ्तार किया। जांच जारी है।