अरुण वाघमोडे, अहमदनगरबसस्थानकावर किंवा रस्त्यावर दिवसभर उन्हात बसून एका करवंदाच्या पाटीचे अवघे २५० रुपये कसेबसे मिळतात़ पहाटे पाच वाजताच डोंगर-दऱ्यात जाऊन हे करवंद तोडताना जिवाचा आटापिटा करावा लागतो़ पण या दुष्काळात घरी बसून करायचं तरी काय? करवंदाचे चार पैसे तेल-मिठापुरते होतात़़़तेव्हढाच संसाराला आधाऱ असे सांगत गयाबाई घुले या करवंद विकणाऱ्या महिलेने आपले आर्थिक गणित मांडत दुष्काळाची दाहकताही स्पष्ट केली़ उन्हाळ्यात डोंगर-दऱ्यात पिकणारे करवंद अर्थात डोंगरची काळी मैना दरवर्षी नगर शहरात विक्रीसाठी आणली जाते़ बहुतांश जण हे करवंद खरेदी करून आवडीने त्याची चव चाखतात़ उन्हाळ्यात आष्टी तालुक्यातील बहुतांश कुटुंबातील महिला करवंद विक्रीचा व्यवसाय करतात़ रस्त्यावर करवंदाची पाटी घेऊन बसलेल्या महिलेला दहा नको पाच रुपयांनाच पावशेर करवंद दे म्हणून हुज्जत घालणारे ग्राहक दिसतात़ मात्र, डोंगर ते बाजारपेठेपर्यंत हे करवंद आणण्यासाठी किती कष्ट पडतात याची प्रचिती गयाबाई आणि ताराबाई या करवंद विकणाऱ्या महिलांच्या बोलण्यातून येते़आष्टी तालुक्यातील कारखेल येथील गयाबाई यांचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो़ घरापासून तीन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरात जाऊन त्या करवंद तोडतात़ काटेरी झुडपाला लगडलेले हे करवंद तोडताना हाताला आणि पायाला ओरखाडे बसतात़़़़जखम होते़़़रक्त निघते़ दोन दिवस डोंगरात पायपीट केल्यानंतर एक पाटी करवंद मिळतात़ हे करवंद घेऊन विक्रीस आणली जाते़ दिवसभर बसल्यानंतर करवंदाच्या पाटीचे २५० रुपये मिळतात़ यातले ८० रुपये बसभाड्यासाठी जातात़ १० रुपये जागेची पावती, खाली उरतात अवघे १६० रुपये़ या १६० रुपयांसाठी गयाबाई आणि ताराबाई सारख्या अनेक महिलांना तब्बल दोन दिवस डोंगरदऱ्यांमधून भटकंती करावी लागते़ तेव्हा डोंगरची काळी मैना ग्राहकांपर्यंत पोहोचते़ गावाकडे दुष्काळ असल्याने शेतात पीक नाही़ पिण्यालाही पाणी नाही़ कुठे कामही मिळत नाही़ करवंद विक्रीतून चार पैसे मिळतात़ छोटा ग्लास भरून करवंदाचे पाच तर मोठा ग्लास दहा रुपयांना आम्ही विकतो़ अनेकदा मात्र, दिवसभर बसूनही पाटीतले करवंद संपत नाही़ मग दहाचा वाटा पाच रुपयालाच विकावा लागतो़ कधी शंभर रुपयेही मिळत नाहीत़ -गयाबाई घुले, करवंद विकेत्या, कारखेल.घाटाच्या डोंगरावर करवंद तोडताना जीव मुठीत धरावा लागतो़ साप,विंचवासह दगडावरून पाय घसरण्याचीही भीती असते़ करवंदाचा दोन महिन्याचा हंगाम असतो़ या काळात दोन पैसे मिळविण्याची संधी असते़ दुष्काळामुळे घरी काम नाही़ मजुरीचेही अवघड झाले आहे़ कष्ट करून करवंद विक्रीतून पोटापुरते पैसे मिळतात़ -ताराबाई ठोंबरे, विक्रेत्या, देऊळगाव.
काट्याकुट्याचा तुडवित रस्ता़़़येते डोंगरची काळी मैना
By admin | Updated: May 23, 2016 01:10 IST