लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : तालुक्यातील वडाळामहादेव येथे दोन दिवसांपूर्वी घरात आढळलेल्या राजू निवृत्ती कसबे (४५) यांच्या हत्येप्रकरणी आरोपी जॅक ओहळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने हत्या केल्याची कबुली दिली आहे.
राऊत वस्तीजवळ कसबे यांचा मृतदेह घरात कुजलेल्या स्थितीत आढळला होता. मृतदेहाची दुर्गंधी सुटल्यामुळे परिसरातील लोकांनी शहर पोलिसांना खबर दिली. पोलीस निरीक्षक संजय सानप, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे व उपअधीक्षक संदीप मिटके यांनी घटनास्थळी येत पाहणी केली तसेच स्थानिकांकडून माहिती घेतली.
मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. त्यात घातपाताची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तवली होती. त्यावरून तपास सुरु होता. ओहळ हा कसबे यांचा मित्र होता. दारुच्या नशेत झालेल्या हाणामारीत कसबे यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून ओहळ याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक संजय दुधाडे, किरण पवार, दत्तात्रय दिघे यांनी केला. अमोल कसबे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------