कर्जत : तालुक्यातील कोरेगाव पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मनीषा जाधव यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार शशीकला शेळके यांचा ५३९ मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार शितल धांडे यांना २ हजार ३०९ मते मिळाली.कर्जत येथील तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली. कोरेगाव पंचायत समिती गणाच्या पोट निवडणुकीसाठी तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीच्या उमेदवार मनीषा दिलीप जाधव यांना ५ हजार २३८ मते मिळाली. भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार शशीकला शेळके यांना ४ हजार ६९९ मते मिळाली. अपक्ष उमेदवार शितल धांडे यांनीही २ हजार ३०९ मते मिळवून लक्ष वेधले. निकाल जाहीर होताच मनीषा जाधव यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडून आनंद साजरा केला. गेल्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीकडून भाजपने हिरावून घेतली होती. पुन्हा राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून खेचून आणली. कोरेगाव गणाचा निकाल पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासाठी धक्कादायक आहे. आघाडीचे सर्व नेते एकदिलाने काम करताना दिसले तर युतीमध्ये तसे चित्र दिसले नाही. मनीषा जाधव यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, काँग्रेसचे नेते बाळासाहेब साळुंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, अॅड. कैलास शेवाळे, कोरेगावचे सरपंच शिवाजी फाळके, थेरवडीचे सरपंच वसंत कांबळे, सुनील शेलार, संजय नलवडे यांनी मोठे परिश्रम घेतले.कोरेगाव पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस व मित्र पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळे राष्टÑवादीला यश मिळाले. -राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
कर्जत पंचायत समिती पोटनिवडणूक : कोरेगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा जाधव विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 15:18 IST