श्रीरामपूर : जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी पात्र शिक्षकांकडून २० शाळांच्या पसंतीक्रमाचे आॅनलाईन अर्ज २३ आॅक्टोबरअखेर भरले जाणार आहेत. या पसंतीक्रमामध्ये ज्येष्ठांकडून खो मिळाल्यास कनिष्ठ शिक्षक वगळले जाण्याची भीती निर्माण निर्माण झाली आहे. त्यामुळे कनिष्ठ शिक्षकांनी बदल्यांच्या ढोबळ फेरीला आक्षेप घेतला आहे.जिल्ह्यात १० हजारांच्यावर प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील सुमारे ६ हजार शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत. अंतिम मुदत दिल्याने शेवटच्या टप्प्यात सर्वरवर ताण पडून वेग मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर तपासणी क रून अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऐन दिवाळीत बदल्यांचे अर्ज भरणे शिक्षकांसाठी कंटाळवाणे ठरले आहे.सेवा ज्येष्ठ शिक्षकांनी खो दिल्यास अनेक शिक्षक पसंतीक्रमातून बाद ठरणार आहेत. शिक्षण विभाग देईल त्या शाळेवर हजर होण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर शिल्लक राहणार नाही. त्यातून अनेकांची गैरसोय होणार आहे. त्याऐवजी पुन्हा पसंतीची फेरी घेत कनिष्ठ शिक्षकांची नाराजी टाळता येणार आहे. तसे झाल्यास त्यास कुणाचाही आक्षेप राहणार नाही, असे कनिष्ठ शिक्षकांचे म्हणणे आहे. शिक्षक संघटनांकडेदेखील अनेक कनिष्ठांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र, संघटनांच्या नेत्यांमध्ये ज्येष्ठांचाच भरणा अधिक असल्याने ही बाब गांभीर्याने घेतली गेली नाही. त्यामुळे कनिष्ठ शिक्षकांमध्ये नाराजी आहे.
बदल्यांच्या ढोबळ फेरीला कनिष्ठ शिक्षकांचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 13:46 IST