पारनेर : रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडा घालणारा विश्वजीत रमेश कासार (रा.वाळकी ता.नगर) याला पारनेर पोलिसांनी येरवडा कारागृहातून हस्तांतरण करून अटक केली. या घटनेत आरोपीच्या पत्नीला सहआरोपी करण्यात आले आरोपीकडून कार जप्त करण्यात आली आहे. आरोपी येरवडा कारागृहात सध्या एका अपहरण प्रकरणात शिक्षा भोगत आहे. याबाबत जामगाव येथील अशोक बबन पवार यांनी २९ आॅगस्ट रोजी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यामध्ये डिसेंबर २०१३ ते सात मे २०१४ दरम्यान विश्वजीत कासार व त्याच्या पत्नीने रेल्वेत तिकीट तपासणीसाची नोकरी लावतो, असे सांगून नऊ लाख, पन्नास हजार रूपयांची मागणी केली. या दोघांवर विश्वास ठेवून आपण कासार दाम्पत्यांकडे सात जानेवारी रोजी आठ लाख, सत्तर हजार रूपये दिले होते.खोटी आॅर्डर२३ जानेवारी २०१४ रोजी कोलकत्ता येथील ईस्टर्न रेल्वेचा शिक्का असलेली तिकीट तपासणीची आॅर्डर विश्वजित याने पवार यांच्याकडे दिली. सात फेबु्रवारी ते २४ फेबु्रवारी दरम्यान हावडा रेल्वेस्थानकावर हजर होण्याचे सूचित करण्यात आले होते. नंतर पुन्हा लांब ठिकाणा ऐवजी सहा मे रोजी पवार अंधेरी रेल्वे कार्यालयात हजर होण्यासाठी गेले असता तेथील अधिकाऱ्यांनी ही आॅर्डर खोटी असल्याचे सांगितले. यामुळे विश्वजितचा भांडाफोड झाला. त्यानंतर पवार यांनी विश्वजीतच्या मागे पैशाचा तगादा लावल्यावर त्याने आमची बोळवणच केल्याचे पवार यांनी म्हटले आहे.हस्तांतरण प्रक्रियेने अटकपारनेर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर पारनेर पोलिसांनी विश्वजीत कासार हा येरवडा कारागृहात असल्याचे समजले. सर्व हस्तांतरणप्रक्रिया करून विश्वजीत कासारला पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला पारनेर न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मेढे करीत आहेत. आरोपी विश्वजीत कासार याने अजुनही अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरु आहे.(तालुका प्रतिनिधी)
नोकरीच्या आमिषाने गंडा
By admin | Updated: March 18, 2024 16:41 IST