तिसगाव : वृक्षारोपणासह त्यांचे संवर्धन, बियाणे बँक, जलव्यवस्थापन, वाचनसंस्कृती रूजविण्यासाठी ‘बुक फेस्ट’ अशा लोकोपयोगी कार्यांचा वसा स्व. राजीव राजळे यांनी हयातीत जपला. तेच सामाजिक उपक्रम प्रवाही ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे, असे प्रतिपादन गोरक्षण सेवेचे राज्य कार्यवाह दीपक महाराज काळे यांनी केले.
माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी वृद्धेश्वर साखर कारखाना (ता. पाथर्डी) येथे न्यू इंग्लिश स्कूल, श्रीराम मित्रमंडळ यांच्या वतीने महारक्तदान शिबीर तर राजळे महाविद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा, वृक्षारोपण असे विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे होते. नगरसेवक अनिल बोरुडे, प्रवीण राजगुरू, ‘वृद्धेश्वर’चे संचालक चारुदत्त वाघ, कार्यकारी संचालक जालिंदर पवार, सरव्यवस्थापक भास्करराव गोरे, प्राचार्य राजधर टेमकर, मुख्याध्यापक बी. आर. ताठे आदी उपस्थित होते. वृद्धेश्वर कारखाना, कासारपिंपळगाव ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था कार्यालयातही पदाधिकाऱ्यांनी स्व. राजळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.
विनायक म्हस्के, वसंतराव भगत, राजीव सुरवसे, सोपान तुपे, संभानाना राजळे, विक्रम राजळे, हरिभाऊ शेरकर, शिवाजी भगत आदींसह शिक्षक शिक्षकेत्तर सेवक हजर होते. रामेश्वर राजळे यांनी आभार मानले.