मंगळवारी आदिवासी संघटनेने घुसखोरी प्रश्न आदिवासी आमदार अधिवेशनात आवाज उठवत नाहीत हा प्रमुख मुद्दा घेऊन आमदारांच्या घरावर मोर्चा काढला होता. आमदार उपमुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी मुंबईला होते. बुधवारी ते अकोल्यात आले तेव्हा पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारा दिला.
लहामटे म्हणाले, रास्त मागणीसाठी मोर्चा काढला तर योग्य, पण केवळ राजकारण म्हणून आंदोलन नको. आदिवासी समाजात झालेली घुसखोरी या बाबत सभागृहात आपण अनेकदा आवाज उठवला आहे. आदिवासी सजग कार्यकर्त्यांना ही बाब माहिती आहे. घुसखोरी कुणाच्या काळात झाली हे समाज विसरला नाही. ज्यांनी आदिवासी समाजाच्या शेतजमिनी लुटल्या त्या त्यांनी परत कराव्यात.
अगस्ती साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे मार्गी लागला आहे. अगस्ती चालवताना काटकसर करा असा सल्ला उपमुख्यमंत्री यांनी शिष्टमंडळास दिला. अगस्ती बचाव समन्वय समिती व संचालक मंडळ यांनी सकारात्मक भूमिका घेतली ही बाब तालुक्याच्या हिताची आहे. तसेच पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गातून अकोले तालुका वगळला जाणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्याचे आमदार डाॅ. लहामटे यांनी यावेळी सांगितले.