पिंपळगाव माळवी : महावितरणने थकीत वीज बिल वसुलीसाठी पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील ट्रान्सफॉर्मर बंद केल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपापली वीज बिले भरली. वीज बिल भरूनही परिसरात वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
पिंपळगाव माळवी पंचक्रोशीत यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे विहिरींना अद्यापपर्यंत समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी रब्बी हंगामात विविध प्रकारची बागायती पिके ऊस, कांदा, गहू, भाजीपाला, फळपिके व हिरवा चारा आदी पिके घेतली आहेत. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे पिकांना जास्तीचे पाणी द्यावे लागत आहे; परंतु पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील वीजपुरवठा अनेकदा खंडित होतो. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील शेतकऱ्यांची वीज थकबाकी वाढल्यामुळे थकीत वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने मागील काही दिवसांपासून विशेष मोहीम राबविली आहे. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपापली वीज बिले भरली आहेत; परंतु शेतीपंपासाठी लागणारा वीजपुरवठा अनियमित व वेळोवेळी खंडित होतो.