अहमदनगर : नवनागापूर येथे सुमारे ८ लाख रुपये खर्चून जनसुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांना सर्व दाखले एकाच ठिकाणी मिळणार असून, सेतू केंद्रात हेलपाटे मारण्याची वेळ येणार नाही. तसेच ग्रामस्थांचे पैसेही वाचणार आहेत.
नवनागापूरचे सरपंच डॉ. बबनराव डाेंगरे यांच्या हस्ते सोमवारी (दि. ६) माहिती सुविधा केंद्राच्या कामास प्रारंभ करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालयाशेजारीच हे माहिती सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जनसुविधा व ग्रामनिधीतून सुमारे ८ लाख रुपये खर्चाच्या इमारत कामास प्रारंभ करण्यात आला. नॉनक्रिमिलीअर दाखला, डोमासाईल दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शॉप ॲक्ट दाखला, गॅझेट असे दाखले या माहिती सुविधा केंद्रातून ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहेत. तसेच ८ लाख रुपये खर्चून अथर्व कॉलनी येथे ६० मीटर व खंडोबानगर येथे ५५ मीटर, सम्राटनगर येथे ५० मीटर अशा तीन रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामांनाही सोमवारी प्रारंभ करण्यात आला. या वेळी सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, सदस्य सागर सप्रे, गोरख गव्हाणे, बाबासाहेब भोर, संजय चव्हाण, दीपक गीते, अर्जुन सोनवणे, संजय गीते, मंगल गोरे, संगीता भापकर, गणेश चव्हाण, अविनाश लकारे, रामभाऊ अडसुरे, ग्रामविकास अधिकारी संजय मिसाळ, ठेकेदार किशोर सप्रे उपस्थित होते.
..............
०६ नवनागापूर
अथर्व कॉलनी येथील सिमेंट रस्त्याच्या कामास प्रारंभ करताना सरपंच डॉ. बबनराव डोंगरे. समवेत सागर सप्रे, संजय मिसाळ, किशोर सप्रे, गोरख गव्हाणे, अर्जुन सोनवणे आदी.