सुपा : २७ जुलै २००१ राेजी रायतळे (ता. पारनेर) येथील रहिवासी बाजीराव शिंदे यांच्या आईचे निधन झाले. तशी ग्रामपंचायतीच्या जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये नोंद झाली; परंतु, २०१५-१६ च्या कामगार तलाठी वाळवणे यांच्या महाराष्ट्र जमीन महसूल अभिलेखात शिंदे यांच्या आई सावित्राबाई शिंदे जिवंत असल्याचा उल्लेख केला आहे. माझी आई जिवंत असल्याची नोंद करणाऱ्या तलाठ्याने तिला त्वरित माझ्या घरी आणून सोडावे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
महसूलचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी संबंधित तलाठ्यास तसे आदेश द्यावेत, अशी विनंती मुलगा बाजीराव शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
बाजीराव शिंदे यांची रायतळे येथे गट नं. ३७१/७२ मध्ये शेतजमीन आहे. विहीर खोदल्याने तशी नोंद सातबारा उताऱ्यावर तत्कालीन तलाठी व मंडलाधिकारी यांनी लावली होती. मात्र, सध्या गट नं. ३७२ वरील सीमा व भूमापन, चिन्ह या रकान्यात त्यांच्या आई सावित्राबाई शिंदे यांची विहीर अशी नोंद आढळून आली आहे. आईचे २७ जुलै २००१ ला निधन झाले आहे. त्यामुळे ही बाब संबंधित तलाठी श्रावण काते यांच्या निदर्शनास आणून दिली. अनेकवेळा समक्ष भेटून दुरुस्तीबाबत विनंती केली; परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रारी अर्ज दिला. माझी आई जिवंत असल्यास संबंधित तलाठ्याने आईला माझ्या घरी त्वरित आणून सोडावे, असे आदेश द्या, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने २९ ऑक्टोबर २०२० रोजी तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. तसेच उपविभागीय अधिकारी यांनी २६ ऑक्टोबर २०२० रोजी तहसीलदार यांना कारवाई करण्याबाबत आदेश दिले. त्यावर तहसीलदारांनी तलाठ्याला पत्र देऊन दुरुस्तीचे आदेश दिले. असा सगळा पत्रव्यवहार होऊनही महसुली कागदपत्रात दुरुस्ती झाली नाही. वरिष्ठांच्या आदेशानेही शिंदे यांचा प्रश्न सुटला नाही.
---
मयत आईच्या नावाची नोंद चुकून झाली आहे. एनआयसी पुणे यांच्याकडे दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवला असून, त्याचा पाठपुरावा करत आहे. तांत्रिक दोषाने झालेली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- श्रावण काते,
कामगार तलाठी, वाळवणे