अहिल्यानगर : लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी पती-पत्नीत वाद झाला. हा वाद न्यायालयात गेला. सुनावणी दरम्यान पत्नीने विरोधात साक्ष दिल्याने नाराज झालेल्या पतीने अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून स्वतःला संपविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना शुक्रवारी (दि. २१) खारेकर्जुने (ता. अहिल्यानगर) शिवारात घडली.
सागर सुधारक निमसे (वय २६, रा. खारेकुर्जने) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत तरुणाचे अडीच वर्षापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर सहा महिन्यांपासून पत्नी नांदत नव्हती. ती माहेरी आईकडे राहत होती. पती-पत्नीचा वाद न्यायालयात गेला. येथील जिल्हा न्यायालयात शुक्रवारी (दि. २१) सुनावणी होती. या सुनावणीला पत्नीही हजर होती.
सुनावणी दरम्यान पत्नीने सागरच्या विरोधात साक्ष दिली, असे सागर याचे म्हणणे होते. याचा राग मनात धरून सागरने टोकाचे पाऊल उचलले. त्याने सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली. त्यानंतर सागरने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सागर घरी आला नाही. त्यामुळे नातेवाइकांनी शोध घेतला असता हिंगणगाव ते खारेकर्जुने रोडवर त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळून आला.