अहमदनगर : पुढील महिन्यात होणारी आरोग्य भरती राज्य शासनाकडून अचानक स्थगित झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सुमारे साडेपाचशे जागांची भरती होणार आहे. मात्र, ही भरती स्थगित झाल्याने आता शासनाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा उमेदवारांना लागली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोकडी पडणारी आरोग्यसेवा भरून काढण्यासाठी शासनाने नुकत्याच राज्यात साडेआठ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्याचे जाहीर केले. यासाठी नवीन अर्ज मागविण्यात येणार नसून मार्च २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी अर्ज केले त्यांनाच संधी मिळणार आहे. त्यावेळी १८ संवर्गाच्या जागा होत्या. आता तूर्तास केवळ आरोग्य विभागाच्या पाच संवर्गासाठी रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेच्या मार्गदर्शक सूचना दि. १४ जून रोजी ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य पर्यवेक्षक, औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका या पदांच्या भरतीसाठी ७ आणि ८ ऑगस्टला लेखी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु जूनअखेर पुन्हा आदेश काढून शासनाने ही भरती पुढील आदेश येईपर्यंत स्थगित ठेवल्याने इच्छुकांचा भ्रमनिराश झाला आहे.
नगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात १३ औषधनिर्माता, ३ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, २०६ आरोग्यसेवक (पुरुष) व ३५२ आरोग्यसेविका (महिला) अशा सुमारे साडेपाचशेहून अधिक जागा भरायच्या आहेत; परंतु भरतीबाबत पुढील आदेश येत नसल्याने आधीच दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या उमेदवारांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
---------
केवळ अपंगांना करता येणार अर्ज
२०१९च्या भरतीमध्ये अपंगांना ३ टक्के जागा राखीव होत्या; परंतु या जागा वाढवून मिळाव्यात म्हणून न्याप्रविष्ट झालेल्या या प्रकरणात पुढे न्यायालयाने ४ टक्के जागांचा समावेश करण्याचा आदेश दिल्याने आता ४ टक्क्यांप्रमाणे केवळ अपंगांच्या जागांसाठी जाहिरात देण्यात येणार आहे. त्यामुळे अपंगांनाच नव्याने अर्ज करता येतील. इतर उमेदवार मात्र २०१९च्या भरती प्रक्रियेतील असणार आहेत.
-----------