अहमदनगर : शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणाची मंगळवारी होणारी सुनावणी आता २८ जुलैपर्यंत लांबणीवर पडली आहे. सरकारी वकील, फिर्यादी आणि सहआरोपी गैरहजर असल्याने सुनावणीचे कामकाज होऊ शकले नाही.लांडे खून प्रकरणी गेल्या आठवड्यात काँग्रेसचा माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर याच्यासह आमदार शिवाजी कर्डिले, माजी महापौर संदीप कोतकर, त्यांचे दोन भाऊ यांच्यासह १५ जणांवर नाशिक जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवार (दि.१५) पासून या खटल्याची सुनावणी सुरू होणार होती. मात्र सदर खटल्याचे कामकाज पाहणारे सरकारी वकील काही कारणास्तव रजेवर होते. तर कुलदेवतेला गेलो असल्याने उपस्थित राहता येत नसल्याचे फिर्यादीने न्यायालयाला कळविले होते. या खटल्यातील सहआरोपी आमदार शिवाजी कर्डिले यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना न्यायालयात उपस्थित राहता येत नसल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. त्यामुळे या खटल्याचे कोणतेही कामकाज झाले नाही. या खटल्याची सुनावणी आता २८ जुलैपासून सुरू होणार असल्याचे नाशिक जिल्हा न्यायालयातील सरकारी वकिलांनी सांगितले. (प्रतिनिधी)
लांडे खून खटल्याची सुनावणी २८ ला
By admin | Updated: July 16, 2014 00:45 IST