अहमदनगर : काही दिवसांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने तालुकास्तरीय परिस्थितीचा पूर्वतयारी आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य समितीचे सभापती प्रताप शेळके यांनी दिल्या.
जिल्हा परिषद आरोग्य समितीची बैठक शुक्रवारी शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आरोग्यासह विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागांतर्गत सुरू असलेल्या बांधकामांचा आढावा घेऊन निधी शंभर टक्के खर्च होईल, याबाबत काळजी घेण्याच्या सूचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या. कोरोना आजार बरोबरच इतर साथीच्या आजाराबाबत आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी व तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर व उपकेंद्रांना भेटी देण्याबाबतचे नियोजन करावे, असेही शेळके म्हणाले. १ जुलैपासून जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. त्याबाबतही आरोग्य विभागाने नियोजन करावे, असे शेळके म्हणाले.
बैठकीला सदस्य सीताराम राऊत, रामभाऊ साळवे, सोमनाथ पाचारणे, नंदाताई गाढे आणि आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.