पाथर्डी : तालुक्यातील श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे सद्गुरू रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या ३७ व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पंढरीनाथ महाराज उंबरेकर यांच्या आशीर्वादाने व भागवत महाराज उंबरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारपासून (दि.१४) अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद्भागवत कथेस प्रारंभ झाला आहे. दररोज पहाटे काकडा, सकाळी विष्णुसहस्रनाम, शिवलीलामृत पारायण, दुपारी एक ते तीन या वेळेत संगीत भजन, दुपारी तीन ते पाच या वेळेत प्रवचन, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ सायंकाळी सहा ते नऊ श्रीमद्भागवत कथा व नंतर महाप्रसाद दिला जाणार आहे. भागवताचार्य डॉ. विकासानंद महाराज मिसाळ हे कथा निरूपण करीत आहेत. किसन महाराज पाठक, भानुदास महाराज म्हस्के, चांगदेव महाराज म्हस्के, सुभाष महाराज राऊत, तुळशीराम महाराज आडसरे, सोमनाथ महाराज गडाख, विष्णू महाराज शिंदे, विनायक महाराज औटी, निवृत्ती महाराज बोडखे, बाळकृष्ण महाराज खांदे, आदिनाथ महाराज हारदे, वेणुनाथ महाराज वेताळ, उद्धव महाराज चन्ने, भानुदास महाराज शिरसाट यांचे प्रवचन होणार आहे.
बुधवारी (दि. २०) मीराबाई महाराज मिरीकर यांचे सकाळी नऊ वाजता कीर्तन होणार आहे. गुरुवारी (दि. २१) सकाळी नऊ वाजता भागवत महाराज उंबरेकर यांचे काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.