श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आले. मात्र, महसूल विभागाने पिण्याच्या पाण्याने तलाव भरण्यासाठी जलसंपदा विभागाला जम्बो यादी दिली आहे. त्यामुळे पाणी परिस्थिती व पिकांना लागणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन जलसंपदा विभागाने कुकडीच्या आवर्तनात ५० टक्क्याने कपात करून आता फक्त फळबागांना पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला रब्बी हंगाम जळून जाणार आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन शेतकऱ्यांना मृगजळ ठरणार आहे. कुकडीच्या आवर्तनावरून राजकीय नेत्यांनी मोठा गाजावाजा केला. अखेर ३ डिसेंबरपासून रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आले. ३० दिवसात साडेचार टीएमसी पाणी वापरून ‘टेल टू हेड’ पद्धतीने आवर्तन करण्यासाठी करमाळा, कर्जत तालुक्याला पाणी देण्यात आले. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी टंचाई शाखेची बैठक घेतली आणि नेहमीप्रमाणे पिण्याच्या पाण्याचे तलाव भरण्याचा निर्णय घेतला. प्रचलित तलावात पोलीस बंदोबस्तात पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागास देण्यात आले. जलसंपदा विभागाने पारनेर तालुक्यातील ७ हजार हेक्टर क्षेत्र, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यासाठी प्रत्येकी १५ हजार हेक्टर व करमाळा तालुक्यासाठी १२ हजार हेक्टर क्षेत्र गृहित धरून आवर्तनाचे नियोजन करुन यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र,गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय पिकेही दुप्पट पाणी शोषण करु लागली. अशी परिस्थिती गृहीत धरलेल्या क्षेत्रास पाणी देणे अवघड झाले आहे. पिकांना की तलाव भरण्यासाठी पाणी सोडावे, अशी द्विधा मनस्थिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची झाली आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीतून मार्ग काढताना शेतकऱ्यांच्या फळबागांना पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून फळबागांना पाणी देण्यास सुरुवात झाली आहे. या निर्णयामुळे ज्वारी पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. आमदार राहुल जगताप यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून कुकडीचे आवर्तन तीन दिवसांनी वाढवून घेतले आहे. कुकडी पाटपाणी कृती समिती सदस्यांनी डी वाय ९ ते १४ या वितरीकांना ३ ऐवजी ७ दिवस पाणी देण्याची मागणी केली आहे. मात्र, कुकडीचे कार्यकारी अभियंता सुुभाष कोळी यांनी कोणतेच ठोस आश्वासन दिले नाही. यावरुन सुरू असलेले आवर्तन गुंडाळले जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
कुकडीच्या आवर्तनात निम्म्याने कपात
By admin | Updated: December 18, 2015 23:15 IST