निघोज ग्रामपंचायत सरपंच पदासाठी ९ फेब्रुवारी २०२१ रोजी निवडणूक असताना ग्रामपंचायतीचे दोन सदस्य दिगंबर भागाजी लाळगे व गणेश कवाद यांचे मतदानाच्या दोन दिवसआधी गावातीलच विरोधी गटातील गुंड प्रवृतीच्या २० ते २५ जणांच्या टोळक्याने खेड परिसरातून शस्त्रांचा धाक दाखवून अपहरण केले होते. त्यामुळे ते सरपंचपदाच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहिले. याबाबत खेड पोलिसांनी विठ्ठल कवाद यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला होता. पुढे दिगंबर लाळगे व गणेश कवाद यांनी सुटकेनंतर खेड पोलिसांना त्यांच्यासोबत झालेल्या गैरकृत्याचे सत्य कथन करून जबाब दिला होता. खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निघोज ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन वराळ, मंगेश वराळ यांनी अटकेच्या भीतीपोटी अटकपूर्व जामीनासाठी खेड न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर त्यांना तात्पुरता जामीन मंजूर झाला होता.
दोन दिवसांपूर्वी खेड न्यायालयाने त्यांचा जामीन कायम करण्यास नकार दिला. आरोपींनी केलेले कृत्य गंभीर स्वरूपाचे आहे व गुह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची गरज असल्याने आरोपींचा जामीन नामंजूर करत असल्याचा निकाल देण्यात आला. विठ्ठल कवाद यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये आरोपी सुनील वराळ, नीलेश घोडे, अजय वराळ, धोंडिबा जाधव, राहुल वराळ व इतर १५ आरोपी आहेत.
आरोपींच्या बाजूने वकील ठाणगे यांनी या प्रकरणात आरोपींना खोट्या पद्धतीने राजकीय द्वेशातून गुंतवल्याचा युक्तिवाद केला. सरपंच निवडीच्या कागदपत्रांवरून गुह्यातील मुख्य आरोपी व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सचिन वराळ याच्या पत्नीची सध्या सरपंचपदी निवड झालेली असल्याने, आरोपींचा या गुह्यात सहभाग असण्याची शक्यता असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे यातील सर्व आरोपींना तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा करतेवेळी वापरलेली वाहने, हत्यारे व इतर मुद्देमाल ताब्यात घेण्याचा आदेश दिला.