राशीन : कर्जत तालुक्यातील राशीन येथील यमाईदेवीचा पालखी सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला. लाखो भाविकांनी आईसाहेबांचा जयघोष करीत पालखीचे दर्शन घेतले. राशीन येथील मंदिरात मंगळवारी विजयादशमीनंतर रात्री देवीला कौल लावला होता. रात्रीसाडे अकरा वाजता देवीने उजवा कौल मिळाल्यावर पालखी उत्सवाची तयारी झाली. देवीचे मुखवटे मानकऱ्यांच्या हस्ते पालखीत ठेवून आरती केली. यानंतर रात्री बाराच्या पुढे पालखीचे मंदिरातून प्रस्तान झाले. रात्रीच देवीच्या मंदिरामागील पाऊतका, रावकाळेवस्ती रस्त्याकडील पाऊतका येथे पालखी गेली. सकाळी दिवस उगवण्याच्या सुमारास पालखीचे गावात आगमन झाले. बुधवारी दिवसभर पालखी राशीनमध्ये ग्रामप्रदिक्षणेसाठी फिरवण्यात आली. पालखीच्या स्वागतासाठी सडा, रांगोळ्या काढून गावकऱ्यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी दोदारी आरती करण्यात आली. रात्री उशिरा पालखी मंदिरात गेली. या दरम्यान राज्याच्या विविध भागांतून आलेल्या सुमारे पाच लाख भाविकांनी राशीनच्या जगदंबा (यमाई) देवीच्या पालखीचे दर्शन घेतले. या वेळी खेळण्यावाले, बंगाळेवाले, कुंचेवाले, मानकरी देवीच्या पालखीरथाबरोबर चालत होते. यंदाच्या वर्षी पाऊस चांगला असल्यामुळे यात्रेसाठी गर्दी झाली होती. (वार्ताहर)
राशीन येथे ‘आईसाहेबां’चा जयघोष
By admin | Updated: October 13, 2016 00:47 IST