लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : महापालिका स्थापनेपासून दूरदृष्टी आणि प्रशासनावर वचक ठेवणारा एकही आयुक्त लाभला नाही. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराची गती मंदावली असून, सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक आयुक्तपदी करावी, अशी मागणी माजी स्थायी समिती सभापती संजय गाडे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती गाडे यांनी निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर महापालिका आयुक्तांच्या सेवानिवृत्तीचे ठिकाण बनले आहे. ज्या अधिकाऱ्यांची सेवानिवृत्तीचे एक किंवा दोन वर्षे राहिलेले आहेत, अशा अधिकाऱ्यांची आयुक्त म्हणून नियुक्ती होते. त्यामुळे शहराच्या विकासाचे निर्णय होत नाही. अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. आयुक्तांनी किमान तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणे अपेक्षित आहे. परंतु, आतापर्यंत एकमेव विजय कुलकर्णी यांनी तीन वर्षांचा आयुक्तपदाचा कार्यकाल पूर्ण केला असून, इतर सर्व आयुक्तांची एक-दोन वर्षांतच बदली झालेली आहे. त्यामुळे प्रशासनावर वचक राहत नाही. शहराच्या विकासासाठी दूरदृष्टी आणि सक्षम आयुक्तांची नेमणूक करावी, अशी मागणी गाडे यांनी केली आहे.
...