कोविडच्या पार्श्वभुमीवर साई मंदिर बंद असल्याने हजारो कामगारांचे काम व वेतन थांबले आहे़ साईभक्तांची आवक नसल्याने शिर्डी व पंचक्रोशीचे अर्थकारणही ठप्प झाले असल्याने उदरनिर्वाहाचे साधनही उपलब्ध नाही. अनेक कर्मचारी भाडोत्री रूम घेऊन राहतात़ त्यांचे घरभाडे व वीज बिलही थकले आहे. या परिस्थितीत दवाखाना व किराणासाठी उसनवारी करावी लागत आहे. पगार कधी सुरू होतील, याची शाश्वती नसल्याने उसनवारीनेही मदत मिळणे अवघड बनले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड बनले आहे. त्यामुळे पहिल्या लॉकडाऊनप्रमाणे किमान पन्नास टक्के वेतन मिळावे, अशी कामगारांची अपेक्षा आहे.
..............
सवलती मिळाव्यात
नव्याने कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या नियुक्तीच्या कालावधीत ५९२ कर्मचाऱ्यांना आदेशात नमूद केल्याप्रमाणे वैद्यकीय सवलत, रजा, सुट्या, प्रॉव्हिडंट फंड वगैरे सवलती संस्थान नियमाप्रमाणे मिळाव्यात, अशीही मागणी केली जात आहे. यातीलही अनेक कामगार सध्या घरीच आहेत, त्यांनाही पन्नास टक्के वेतन द्यावे, अशीही कामगारांची मागणी आहे.