Ahilyanagar: एक १२ वर्षीय परप्रांतीय मुलगी पतंग उडवताना विहिरीत पडली. पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. ही घटना शुकवारी सकाळी मानोरी ग्रामपंचायत हद्दीत घडली. बिनीता बिष्णू थापा (वय: १२), असे मयत मुलीचे नाव आहे. नेपाळ येथील एक कुटुंब राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायत हद्दीत खिळे वस्ती रोड परिसरात राहत आहे. बिनीता थापा सकाळी इतर मुलांबरोबर आपल्या घराजवळ पतंग उडवीत होती. पतंग उडवीत असताना ती जवळच असलेल्या विहिरीत पडली. ती पाण्यात बुड्डू लागल्याने इतर मुलांनी आरडाओरडा केला. त्यावेळी परिसरातील सर्जेराव जाधव, तुषार बाचकर यांनी विहिरीत उड्या घेतल्या. दोरीच्या साहाय्याने तिला विहिरीतून बाहेर काढले.
पाच महिन्यांपूर्वी आली मानोरीत मयत मुलीचे वडील एका हॉटेलमध्ये आचारी काम करतात. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. त्यापैकी बिनीता थापा ही मोठी मुलगी पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. पाच महिन्यांपूर्वी ती नेपाळ येथून आली होती. मुलीने हट्ट केल्यामुळे तिचे वडील बिष्णू थापा यांनी तिला पतंग आणून दिला होता.