संगमनेर : शहरानजीक असलेल्या घुलेवाडी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सोपान राऊत यांना ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत मतदानाने पायउतार केले. सोमवारी (दि. १३) गावातील महात्मा फुले विद्यालयात मतदान प्रक्रिया पार पडली. थेट जनतेतून निवडून आलेल्या राऊत यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता.
५ जुलै रोजी लोकनियुक्त सरपंच राऊत यांच्या विरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव विशेष सभेत मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी सरपंच व १७ सदस्य असे एकूण १८ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. अविश्वास ठराव नोटीसमध्ये नमूद मुद्यांवर सर्वांची मते जाणून घेतली आणि त्यानंतर सरपंच राऊत यांनी त्यांची बाजू मांडली होती. त्यानंतर अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. १६ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने तर २ सदस्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले होते. तीन चतुर्थांशपेक्षा जास्त मते असल्यामुळे ठराव मंजूर करण्यात आला होता. तहसीलदार अमोल निकम यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना याबाबत अहवाल पाठवला होता. सरपंच राऊत हे थेट जनतेतून निवडून आले असल्याने जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या आदेशानुसार सोमवारी विशेष ग्रामसभेत मतदानाची प्रक्रिया पार पडली.
.............
संगमनेर तालुक्यातील पहिलीच घटना
१३ हजार ७६३ मतदारांपैकी २२९२ मतदारांनी मतदान केले. ठरावाच्या बाजूने १ हजार १८४ आणि ठरावाच्या विरोधात १ हजार १५ ग्रामस्थांनी मतदान केले. तसेच अवैध मतदान ९३ इतके झाले. १६९ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे तहसीलदार निकम यांनी सांगितले. त्यामुळे सरपंच राऊत यांना पायउतार व्हावे लागले. साडेतीन वर्षांपूर्वी जनतेतून राऊत हे सरपंच झाले होते. लोकनियुक्त सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर होऊन त्यांना पायउतार होण्याची ही संगमनेर तालुक्यातील पहिलीच घटना आहे.