जवानाच्या अंत्यविधीवेळी गॅलरी कोसळली. नऊ महिला जखमी, चार गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 18:15 IST
हिमाचल प्रदेशमध्ये कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेले जवान दत्तात्रय बाळासाहेब बनकर यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या महिलांच्या अंगावर गॅलरीची भिंत कोसळली. नगर तालुक्यातील अकोळनेर येथे झालेल्या या घटनेत नऊ महिला जखमी झाल्या
जवानाच्या अंत्यविधीवेळी गॅलरी कोसळली. नऊ महिला जखमी, चार गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : हिमाचल प्रदेशमध्ये कर्तव्य बजावत असताना मृत्यू झालेले जवान दत्तात्रय बाळासाहेब बनकर यांच्या अंत्यविधीसाठी आलेल्या महिलांच्या अंगावर गॅलरीची भिंत कोसळली. नगर तालुक्यातील अकोळनेर येथे झालेल्या या घटनेत नऊ महिला जखमी झाल्या असून त्यामधील चौघींची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी नगरला हलवण्यात आलं आहे.जवान दत्तात्रय बाळासाहेब बनकर ( वय ३४) हिमाचल प्रदेशमध्ये असताना बफार्खाली दबून मरण पावले. त्यांच्यावर नगर तालुक्यातील अकोळनेर या गावी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मृतदेह आज दुपारी आणण्यात आला. त्यांच्या घरासमोर अंत्यविधीसाठी गावातील ग्रामस्थ, नातेवाईक जमले होते. अंत्यदर्शनासाठी मृतदेह घराच्या अंगणात ठेवण्यात आला होता. मृतदेहाशेजारी काही महिला बसल्या होत्या. अंगणात गर्दी झाल्याने काही जण छतावर चढले. याचवेळी या भिंतीवर दबाव वाढल्याने भिंत कोसळली. यामुळे खाली बसलेल्या महिलांच्या अंगावर स्लॅबचा भाग पडला. या जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.