अहमदनगर : जिल्ह्यातील अनेकजण सध्या कोरोनाशी झुंज देत आहेत. कोरोनाच्या या लढाईत असंख्य हात मदतीसाठी पुढे आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील काही सामाजिक संस्थांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय केली आहे. जेवण तयार करण्यापासून ते रुग्णालयात पोहोच करण्यापर्यंतचे सर्व काम या संस्थाच करीत आहेत.
कोरोनाने हाहाकार माजविला आहे. ग्रामीण भागातून रुग्ण व त्यांचे नातेवाईक शहरात दाखल होत आहेत. ग्रामीण भागात सुविधा नसल्याने शहरात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सरकारी व खासगी रुग्णालयांभोवती नातेवाईकांचा घोळका पहायला मिळतो. या नातेवाईकांना मोफत जेवण पुरविण्यासाठी शहरातील काही सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. घर घर लंगर, टिम ५७, सिधी, पंजाबी शिख सामाजिक संस्था यासारख्या अनेक संस्था रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी जेवण पुरवित आहेत. घरघर लंगरकडून महापालिकेच्या नटराज, जैन पितळे, डॉनबास्को, यासह रेल्वेस्थानक, जिल्हा शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालयात मागेल त्याला पॅक बंद जेवण दिले जात आहे.
आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली टिम ५७ जेवण पुरविण्याचे काम करीत आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत मागणी नोंदविली जाते. मागणीनुसार जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयांत मुक्कामी असलेल्या ४०० हून अधिक नातेवाईकांना जेवण पुरविले जात आहे. दुपारी २ ते ३ तर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हे जेवण दिले जात आहे. सिंधी, पंजाबी शिख सामाजिक संस्थेकडून जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत दररोज ७०० हून अधिक जणांना डबे पुरविले जात आहेत.
.....
दिवसभर स्वयंपाक
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे जेवण पुरविले जाते. दुपारचे जेवण पोहोच केल्यानंतर पुन्हा सायंकाळच्या जेवणाची तयारी सुरू होते. टिम ५७ हे घरी जेवण तयार करतात. घरघर लंगरचे हरजित सिंग वधवा एका हॉटेलमध्ये, तर सिंधी, शिख पंजाबी ही संस्था गुरुव्दार येथे जेवण तयार करून ते पोहोच करतात.
.....
कॉलनीतील महिलाही करतात मदत
आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या टिम ५७ या संस्थेला जेवण तयार करण्यासाठी कॉलनीतील महिलाही मदत करतात. तसेच घरघर लंगर व सिधी, शिख पंजाबी समाज संस्थेचे पदाधिकारी स्वत: स्वयंपकासाठी मदत करीत असल्याचे सांगण्यात आले.
...
दररोज सकाळी ९ ते ११ या वेळेत आम्ही मागणी घेतो. त्यानुसार दुपारी १ ते २ यावेळेत नातेवाईक जिथे असतील, तिथे पॅक बंद डबे पोहोच केले जातात.
- स्वप्निल परवते, संचालक , टिम ५७
...
सिंधी शिख, पंजाबी समाजाच्या वतीने गुरुव्दार येथे जेवन तयार केले जाते. दुपारी ४०० ते ५०० डबे पोहोच केले जातात तसेच सायंकाळी २०० ते ३०० डबे पोहोच केले जात असून, काही कुटुंबांनाही डबे पोहोच केले जात आहे.
- महेश मध्यान, अध्यक्ष, सिंधी, शिख पंजाबी सामाजिक संस्था
....
- मागील लॉकडाऊनमध्ये ४ लाख २६ हजार डबे पोहोच केले. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. सध्या महापालिकेच्या नटराज, जैन पितळे, डॉनबास्को कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना दोनवेळचे जेवन दिले जाते. तसेच जिल्हा रुग्णालय, खाजगी रुग्णालये, रेल्वेस्टेशन आदी भागातही जेवन पोहोच केले जात आहे.
- हरजिसिंग वधवा, घरघर लंगर सेवा