अहमदनगर : जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांनी काेविड सेंटर उभारणीपासून रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या दोन वेळच्या जेवणाची मोफत सोय केली आहे. जेवण तयार करण्यापासून ते रुग्णालयात पोहोच करण्यापर्यंतचे सर्व काम या संस्थाच करीत आहेत.
घरघर लंगर, टीम ५७, सिंधी, पंजाबी, शीख सामाजिक संस्था यासारख्या अनेक संस्था रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी जेवण पुरवित आहेत. घरघर लंगरकडून महापालिकेच्या नटराज, डॉनबास्को, रेल्वेस्थानक, जिल्हा शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालयात मागेल त्याला पॅक बंद जेवण दिले जात आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली टीम ५७ जेवण पुरविण्याचे काम करीत आहे. सकाळी ९ ते ११ या वेळेत मागणी नोंदविली जाते. सिंधी, पंजाबी शीख सामाजिक संस्थेकडून जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत दररोज ७००हून अधिक जणांना डबे पुरविले जात आहेत. केदारेश्वर साखर कारखाना (पाथर्डी), विविध सामाजिक संस्था (अकोले), आमदार नीलेश लंके, आमदार लहू कानडे, आमदार रोहित पवार, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट (कोपरगाव), साईबाबा संस्थान (शिर्डी) माजी आमदार चंद्रशेखर घुले (शेवगाव), शनि शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट, नगर शहरात अनाप प्रेम, रोटरी क्लब आदी संघटनांनी कोविड सेंटर उभारले आहे.