कोपरगाव : गेली साडेचार वर्षे कोपरगाव नगरपालिकेमध्ये कोल्हे गटाने बहुमताच्या जोरावर विकासकामांना सातत्याने पाठिंबा दिला आहे. परंतु चुकीचे अंदाजपत्रक केले म्हणून बहुमताच्याच जोरावर भ्रष्टाचार रोखण्याचे काम केले आहे. हे पोटतिडकीने विरोधक मांडत होते. मग आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सन २०२१ - २२ च्या वित्तीय अंदाजपत्रकालाही कोल्हे गटाने बहुमताने मंजुरी दिली, हेही सांगण्याचे धाडस त्यांनी करावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी केले.
निखाडे म्हणाले, नगराध्यक्ष व राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक नेहमी भाजपा-शिवसेना युतीच्या नगरसेवकांवर आरोप करतात. बहुमताच्या जोरावर नगरपालिकेमध्ये विकासकामांना विरोध करतात, असा डांगोरा पिटतात. परंतु, गेली साडेचार वर्षही पालिकेमध्ये कोल्हे गटाचे बहुमत आहे. मग आजपर्यंत झालेल्या विकासकामांना मंजुरी देण्याचे काम केलेले आहे. कधीही विकासाला विरोध केला नाही. परंतु नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये शहरातील काही विकासकामांची अंदाजपत्रके चुकीची केली गेली. विकासकामांना आमचा विरोध नव्हता, आजही नाही. फक्त या चुकीच्या एस्टिमेटची दुरुस्ती करून अंदाजपत्रक करण्याची आमची मागणी होती. ही मागणी नगराध्यक्षांनी मान्य केली नाही. त्यामुळे यामधून त्यांचा मोठा भ्रष्टाचार करण्याचा डाव आम्ही बहुमताने हाणून पाडला. ही वस्तुस्थिती माहीत असूनही नगराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी गावभर आकाडतांडव केले. पत्रके वाटून जनतेमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषदा, सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हे गटाला बदनाम करण्याचे षड्यंत्र चालविले आहे.