अहिल्यानगर : महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच एमआयएमची एन्ट्री होणार आहे. शहरातील पाच प्रभागांतील २० जागा लढविण्याचा निर्णय एमआयएमने घेतला असून, लवकरच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एमआयएमने महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक ४, ५, १०, ११ आणि १२ मध्ये मस्लीम मतदार आहेत.
या प्रभागांमध्ये एमआयएमकडून उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले जाणार आहेत. एमआयएमकडे २६ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातून २० उमेदवार दिले जाणार असून, त्यासाठीची तयारी पक्षाने सुरू केली आहे. अहिल्यानगर शहरात गेल्या काही दिवसांपासून जातीय तणाव निर्माण झालेला आहे. कोठला येथे झालेल्या दंगलप्रकरणी मुस्लीम तरुणांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. दंगलीनंतर खासदार ओसुद्दीन ओवीसी यांची मुकुंदनगरमध्ये सभा झाली होती. त्यावेळी महापालिकेची निवडणूक ताकदीने लढणार असल्याचे ओवीसी यांनी जाहीर केले होते. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलिल यांनी महापालिका निवडणुकीत लक्ष घातले आहे. इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवार दिले जाणार आहेत. यापूर्वी या पक्षाने कोणतीही निवडणूक लढविली नव्हती. यावेळी एमआयएम ताकदीने निवडणुकीत उतरणार असून, राज्यातील नेत्यांच्या सभांचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.