अहमदनगर : ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी गुरुवारी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पाची पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन सूचना दिल्या. जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लवकरच कार्यान्वित होईल, असेही तनपुरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती भयानक आहे. दोन दिवसांपासून ऑक्सिजनची कमतरता आहे. रेमडेसिविर मिळत नाही. बेड शिल्लक नाहीत. जिल्ह्यात ऑक्सिजन मिळविण्यासाठी मंगळवारी रात्री सर्वांचीच धावाधाव झाली. जिल्ह्यात तीन मंत्री असून ते थोरात हे राज्याच्या कारभारात व्यस्त आहेत, शंकरराव गडाख आजारी आहेत, तर प्राजक्त तनपुरे फारसे सक्रिय दिसत नाहीत, असे ‘लोकमत’ने निदर्शनास आणले होते. त्या पार्श्वभूमीवर मंत्री तनपुरे हे गुरुवारी अखेर जिल्ह्याच्या मैदानात उतरले. तनपुरे यांनी गुरुवारी दिवसभर नगरमध्ये तळ ठोकला. जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. तेथील डॉक्टर, रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या. तेथील ऑक्सिजनच्या प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
------------------
दोन दिवसांत ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित
जिल्हा रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन तयार करण्याच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन दिवसांत तो कार्यान्वित होईल. याची क्षमता जरी जास्त नसली तरी सध्या जो ऑक्सिजनसाठी भार येत आहे, तो या निर्मितीमुळे हलका होईल, असे तनपुरे यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन संपला तर या नव्या प्रकल्पामुळे फारशी धावाधाव करावी लागणार नाही.
------
फोटो- २२ प्राजक्त तनपुरे-१
नगरविकास व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी गुरुवारी जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरची पाहणी करून रुग्णांच्या नातेवाइकांशी चर्चा केली. समवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा.