अहमदनगर : गेल्या दीड महिन्यापासून कांद्याचे भाव पडले आहेत. गुरुवारी नगर बाजार समितीत झालेल्या कांदा लिलावात कांद्याला केवळ ९०० रुपयांचा भाव मिळाला.
गेल्या दीड महिन्यापूर्वी (१५ मार्च) कांद्याला २ हजार रुपयांपर्यंत भाव होता; परंतु त्यानंतर हळूहळू कांद्याचे भाव उतरले. १५ एप्रिल रोजी कांदा ८०० ते ९०० रुपयांपर्यंत खाली आला. त्यानंतर मात्र लॉकडाऊनमुळे नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने आपले कांदा लिलाव बंद ठेवले.
आता २१ दिवसांनंतर पुन्हा बाजार समितीने लिलाव सुरू केले असून गुरुवारी (दि. ६) झालेल्या कांदा लिलावात केवळ दोन हजार क्विंटल (३५६५ गोण्या) कांद्याची आवक झाली. यात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला ७०० ते ९०० रुपयांचा भाव मिळाला.
सध्या कांद्याची आवक कमी असली तरी भावही उतरलेले आहेत. कांदा लिलाव सुरू झाल्याने आता हळूहळू आवक वाढेल, मात्र कांद्याचे दरही वाढावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाव नसल्याने कांदा चाळीत ठेवण्यास सुरुवात केली आहे.
----------
गुरुवारच्या लिलावातील भाव
प्रथम प्रतवारी - ७०० ते ९००
द्वितीय - ६०० ते ७००
तृतीय - ४०० ते ६००
चतुर्थ - २०० ते ४००