ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 2 - देवळाली प्रवरा इरिगेशन बंगला परिसरात तीन वर्षांच्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळला. या मादी बिबट्याचा चार ते पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे कारण तिचा मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आढळला.
मादी बिबट्या कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याच ठिकाणी तिचे शवविच्छेदेन करुन दहन करण्यात आले.
बुधवारी सकाळी नऊ वाजता संजय तांबे हे शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेले असता, त्यांना दुर्गंधी येऊ लागली. यावेळी त्यांनी आपल्या सहका-यांना बोलावून शोधाशोध सुरू केली. तेव्हा जवळच असलेल्या प्रवरा उजवा कालव्याच्या कडेला मादी बिबट्या मृतावस्थेत आढळली.
यानंतर त्यांनी तातडीने वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वन अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. कोल्हारचे पशू वैद्यकिय अधिकारी डॉ. सातपुते यांनी जागेवर शव विच्छेदन केले. त्यानंतर तेथेच मादी बिबट्याचे दहन करण्यात आले.