आरोपीचे नाव श्रावण बाळनाथ आहिरे (४०) असे आहे. तो मूळचा नांदगाव (जि. नाशिक) येथील हिरेनगर या भागातील आहे. सध्या तो श्रीरामपूर येथील खंडाळा शिवारातील एमआयडीसीजवळ मोकळ्या रानात मेंढ्या घेऊन कुटुंबासमवेत राहत होता.
आरोपी आहिरे याने त्याचा मालक संतोष गोराणे याच्याकडून अडीच लाख रुपये उसनवारीने घेतलेले होते. गोराणे यांच्या मेंढ्या सांभाळण्याचे काम तो करत होता. गोराणे यांच्याकडून घेतलेले उसने पैसे बुडविण्याचा आहिरे याचा उद्देश होता. यातूनच रात्री कुटुंबीय झोपलेले असताना गुरुवारी पहाटे त्याने मुलगा सोपान याची गळा दाबून हत्या केली, अशी चर्चा आहे. मात्र त्याला कोणतीही अधिकृत पुष्टी मिळू शकलेली नाही. मुलाची आई व आरोपीची पत्नी सीताबाई यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. ठसे तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे हे गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. आरोपीने मुलाची हत्या का केली, यामागील कारणावर लोकमतने उपनिरीक्षक सुरवडे यांना विचारले असता ते म्हणाले, आरोपीचा जबाब नोंदविण्यात आला आहे. शनिवारी मृत्यूमागील नेमक्या कारणाचा उलगडा होईल. तूर्तास मात्र त्याबाबत सांगता येणार नाही.
-------