नुकतेच संभाजीराजे नगर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कष्टकरी शेतकरी विद्यार्थी चळवळीतील विनीत गाडे, शुभम पांडुळे, सचिन सापते, अक्षय खडके, यशवंत तोडमल, संभाजी कदम यांनी आपल्या भावना संभाजीराजेंसमोर व्यक्त केल्या. यासंदर्भात संभाजीराजेंनी भूमिका घेतली तरच मराठा विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. कारण मागील वर्षीपासून कोरोनामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. मराठा समाजातील पालकांची आर्थिक परिस्थिती ढासळली असून आरक्षणाचा कुठलाही लाभ आतापर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. किमान विद्यार्थ्यांना शिक्षणात तरी सरकारी हातभार मिळावा, जेणेकरून यावर्षी विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे नुकसान होणार नाही. मागील वर्षीचे शैक्षणिक शुल्क अजून पूर्णपणे पालक लॉकडाऊनमुळे भरू शकले नाहीत. त्यामुळे नवीन शैक्षणिक सत्रात सरसकट सर्व मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क सरकारने माफ करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. यावेळी योगेश गागरे, मनोज महाजन आदींसह पालकही उपस्थित होते.
-----
फोटो - संभाजीराजे निवेदन
नवीन शैक्षणिक सत्रात सरसकट सर्व मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क सरकारने माफ करावे, अशी मागणी मराठा विद्यार्थ्यांनी खा. संभाजीराजे भोसले यांच्याकडे केली.