बेलापूर येथे गुप्तधनाचे खोदकाम करणाऱ्या मजुरांनी लेखी तक्रार दिल्यास पोलिसांना तपासाचे आदेश देण्यात येतील, अशी माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली आहे. एका घरामध्ये दुरुस्तीच्या कामाकरिता सुरू असलेल्या खोदकामावेळी रविवारी हे गुप्तधन मिळून आले होते. सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर तहसीलदार पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यात राणी व्हिक्टोरिया यांच्या काळातील ११ किलो चांदीचे नाणे व शिक्के सापडले.
खोदकाम करणाऱ्या मजुरांनी पंचनाम्यापूर्वी तहसीलदारांची भेट घेतल्याची नवीन माहिती समोर आली आहे. या गुप्तधनाच्या साठ्याविषयी त्यांना काही बाबी समोर आणावयाच्या होत्या. त्यामुळे पंचनामा करतेवेळी उपस्थित राहण्याचे आदेश तहसीलदार पाटील यांनी या मजुरांना दिले होते. प्रत्यक्षात मात्र पंचनाम्यावेळी ते गैरहजर राहिले. तहसीलदार पाटील यांनी या माहितीला दुजोरा दिला.
----------