राज्य शासनाने कोरोना आटोक्यात आल्यानंतर गेल्या आठवड्यात काही प्रमाणात निर्बंध उठवले. त्यामुळे अनेक ठिकाणचे व्यवहार सुरळीत झाले. लॉकडाऊनमध्ये रेल्वेलाही प्रवासी नव्हते. अनलॉकनंतर रेल्वेला प्रवासी उपलब्ध होऊन रेल्वेची झालेली आर्थिक भरपाई भरून निघेल असे वाटत असताना अजूनही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मर्यादित आहे. नगर जिल्ह्यातून दौंड-मनमाड हा मुख्य रेल्वेमार्ग जातो. त्याअंतर्गत एकूण सोळा स्थानके या मार्गावर आहेत. सध्या या मार्गावरून ३० एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत, मात्र मध्यमवर्गीय प्रवाशांच्या सोयीसाठी असणाऱ्या पॅसेंजर गाड्या अजूनही बंदच आहेत. त्याचाही फटका रेल्वेला बसत आहे.
रविवारी राखी पौर्णिमा असल्याने तसेच सध्या अनलॉक झाल्याने रेल्वे आरक्षण वाढेल असे वाटत असताना अपेक्षित प्रतिसाद रेल्वेला मिळालेला नाही. लॉकडाऊनपूर्वी नगर शहर रेल्वेस्थानकातून साधारण १५०० प्रवासी दररोज प्रवास करत होते सध्या ती संख्या ७०० ते १०००च्या आसपास आहे. म्हणजे अजूनही रेल्वे प्रवाशांची संख्या पूर्वपदावर आलेली नाही.
------------------
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
सध्या नगर जिल्ह्यातून ३० एक्स्प्रेस गाड्या सुरू आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, झेलम, कर्नाटक, गोवा, संपर्क क्रांती (२), हमसफर (सुपरफास्ट), हबीबगंज, आझाद हिंद (सुपरफास्ट), पाटलीपुत्र, गरीबरथ, दुरांतो, वाराणसी (दोन), ज्ञानगंगा, दूरभंगा, शिर्डी येथून (सात), फेस्टिवल, कोविड स्पेशल अशा तीस एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे.
---------------
गाड्यांना वेटिंग नाही
रेल्वे गाड्यांना सध्या वेटिंग नाही. प्रवाशांना सहजासहजी जागा मिळत आहे. स्लीपर कोच, तसेच एसीमध्येही बुकिंग मिळते.
------------
पॅसेंजर सुरू झाल्यावर वाढू शकतात प्रवासी
वर्षभरापूर्वी लॉकडाऊनमध्ये सर्वच रेल्वे गाड्या बंद होत्या. त्यानंतर जेव्हा काही प्रमाणात गाड्या सुरू झाल्या, तेव्हा प्रवाशांची संख्या खूपच कमी होती. आता हळूहळू प्रवासी संख्या वाढत असून, ती ५० टक्क्यांपर्यंत आली आहे. अजूनही ५० टक्के प्रवाशांची रेल्वेला प्रतीक्षा आहे. पॅसेंजर गाड्या सुरू झाल्यानंतर यात काहीशी वाढ होऊ शकते.