ऑनलाइन लोकमत मिरी (जि. अहमदनगर), दि. 9 - बोहल्यावर चढण्यापूर्वीच नववधूने प्रियकराबरोबर घोड्यावरुन पलायन केल्याची घटना दहिगाव-ने (ता. शेवगाव) येथे मंगळवारी रात्री घडली. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा प्रकार घडल्याने महिलांच्या सन्मानाऐवजी अवमानच झाला असल्याची चर्चा परिसरात होती. कामत शिंगवे येथील या वराचा विवाह दहिगाव-ने येथील सधन कुटुंबातील मुलीबरोबर निश्चित झाला होता. सात मार्च ही लग्नाची तारीखही ठरली होती. विवाहाची जय्यत तयारी वधू पक्षाकडे सुरू होती. नवरदेवाने वरातीसाठी डी.जे.वाल्याला सुपारी दिली. वधू-वरांना हळदही लागली. लग्न घटिका काही तासांवर येऊन ठेपलेली असताना लग्नाच्या आदल्या रात्री नववधुने मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अंगावरील ओल्या हळदीसह प्रियकरासोबत घोड्यावरुन पलायन केले. नववधूला रात्री काही पाहुण्यांनी पाहिले. परंतु कोणालाही संशय आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नववधू घरात, मैत्रिणीकडे व गावात कुठेच न दिसल्याने सर्वत्र शोध घेण्यात आला. परंतु नववधू कोठेच आढळली नाही. या नववधूला नवरदेव पसंत नव्हता अशी माहिती तिच्या मैत्रिणींकडून कळाली. तसेच तिचे घोडेबाजार करणाऱ्या घोडेमालकाशी प्रेमप्रकरण होते, अशीही चर्चा आहे.कामत शिंगवे गावातही प्रतिष्ठित घरचे लग्न असल्याने विवाहाची जय्यत तयारी होती. लग्नाचा थाटमाट उरकला होता. नवरदेवाच्या वऱ्हाडाची विवाहस्थळी जाण्यासाठी लगीनघाई सुरू होती. नवरदेव मारुती मंदिराच्या दिशेने डिजेच्या तालावर वाजत गाजत जात असताना अचानक वधूकडील जवळच्या नातलगाचे निधन झाल्याने विवाह होणार नाही, असा खोटा निरोप वधूपक्षाकडून कामत शिंगवे येथील वरपक्षाकडे फोनद्वारे कळवण्यात आला.लग्न मोडल्याचा निरोप कळताच कामतशिंगवे गावातील वातावरण गंभीर बनले. वधूपक्षाची दहिगावात नाचक्की झाली तशीच अवस्था कामत शिंगवे येथील वरपक्षाकडेही झाली होती. दुसरी कोणतीही मुलगी उभा करा व लग्न लावून द्या, असा सल्ला वरपक्षाकडून फरार वधूकडील मंडळींना देण्यात आला. परंतु ऐनवेळी लग्नासाठी कोणतीही मुलगी तयार झाली नाही. (वार्ताहर)
बोहल्यावर चढण्यापूर्वीच नववधूचे प्रियकरासोबत पलायन
By admin | Updated: March 9, 2017 19:19 IST