बोटा : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे विद्युतवाहक तार तुटून अंगावर पडल्याने विजेचा धक्का बसून तरुणास जीव गमवावा लागल्याची घटना तालुक्यातील कौठे खुर्द येथे घडली. याप्रकरणी घारगाव पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर दुपारी पठार भागातील कौठे खुर्द परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, सुमित सुरेश ढोकरे (वय १३) हा तीन वाजण्याच्या सुमारास खांडगेदरा रस्त्यावरून जात असताना मंदिरानजीक अचानक विद्युत खांबावरील तार तुटून त्याच्या अंगावर पडली. विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गोरक्ष ढोकरे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
वीज तार अंगावर पडून मुलाचा मृत्यू
By admin | Updated: May 14, 2016 00:02 IST