लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सहकारी बँकेसह मुळा, ज्ञानेश्वर आणि वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणूक प्रक्रियेला दिलेली स्थगिती सोमवारी उठविण्यात आली असून, निवडणुकीचा पुढचा टप्पा नववर्षात येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रारूप मतदारयादी मार्चमध्ये प्रसिद्ध करण्यात आली हाेती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढच्या टप्प्याला स्थगिती देण्यात आली हाेती. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर स्थगित होत्या, त्या टप्प्यापासून सुरुवात करण्याचा आदेश बुधवारी सायंकाळी जारी केला. हा आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झाला आहे. जिल्हा सहकारी बँकेसह जिल्ह्यातील मुळा, ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आणि विकास संस्थांच्या निवडणुकीचा पुढचा टप्पा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.
जिल्हा सहकारी बँकेची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. बँकेची अंतिम मतदारयादी नाशिक येथील दुय्यम निबंधकांकडून सोमवारी प्रसिद्ध केली जाईल. मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. नेवासा तालुक्यातील मुळा सहकारी साखर कारखन्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. उमेदवारांची अर्जांची छाननी प्रक्रियाही पूर्ण झाली होती. अर्ज माघारीपासूनचा पुढचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला जाईल. या तालुक्यातील दुसऱ्या लोकनेते घुले पाटील सहकारी साखर कारखान्याची नामनिर्देशन पक्रिया पूर्ण झाली होती. ही प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार असल्याने नेवासा तालुक्यातील राजकारण चांगलेच तापणार आहे. पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठीची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामुळे या कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. याशिवाय जिल्ह्यातील १७ विकास संस्थांच्या निवडणुकीचीही प्रक्रिया सोमवारपासून सुरू केली जाईल.
...
या विकास संस्थांचा निवडणूक प्रक्रिया पुन्हा होणार सुरू
नगर- बाबुर्डी घुमट, मांडवे, बाबुर्डी बेंड, वाळुंज, दशमी गव्हाण, सारोळाकासार, निंबोडी,
श्रीरामपूर- खिर्डी विकास संस्था, माळवाडगाव, कारेगाव,
श्रीगोंदा- राजे शिवछत्रपती विकास संस्था, घाेटवी, सुरेगाव, मुंगूसगाव, साळंवदेवी, जनाई,
पारनेर- सिद्धेश्वरवाडी,
शेवगाव- निंबेनांदुर,
...
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून निवडणुका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. शासनाने पुन:श्च पारंभ अभियानांतर्गत लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका होत असून, निवडणूक काळात सामाजिक अंतर, मास्कचा वापर, सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग, आदी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.