शिर्डी : साईबाबांनी जवळपास एकशे दहा वर्षांपूर्वी शिर्डी गावठाणालगत लेंडीबाग वसवली. बाबांचा हा वृक्षप्रेमाचा व पर्यावरणाचा वारसा वृद्धिंगत करण्यासाठी साई संस्थानने आज शिर्डीपासून दहा किमी अंतरावर साई केशर बागेची मुहूर्तमेढ रोवली.
१९० वर्षांपूर्वी साईनगरीचे महसुली केंद्र असलेल्या कोऱ्हाळे गावच्या हद्दीत केलवड मार्गावर चार एकर श्रेत्रात आज आंबा लागवडीला सुरुवात करण्यात आली. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या हस्ते आंबा लागवड करून या उपक्रमाचा श्रीगणेशा करण्यात आला. साई केशर बाग असे या आंब्याच्या बागेचे नामकरण करण्यात आले आहे. या बागेत आठशे केशर जातीचे आंबे लावण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, राजेंद्र जगताप, बगीचा विभागप्रमुख अनिल भणगे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व कर्मचारी उपस्थित होते.