श्रीरामपूर : कोरोनाच्या संकटामुळे राज्यभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये लीटरमागे ३२ रुपयांवर गेलेला दुधाचा खरेदी दर आता २७ रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे हा व्यवसाय कोलमडण्याच्या स्थितीत आल्याचे व्यवसायातील तज्ज्ञ सांगतात.
नगर जिल्हा हा दूध उत्पादनाकरिता राज्यात ओळखला जातो. जिल्ह्याचे दूध संकलन प्रतिदिन २७ लाख लीटर एवढ्या उच्चांकी पातळीवर पोचले आहे. जिल्ह्यात अमोल, प्रभात लॅक्टलीस, सोनाई यांसह राज्यभरातील नामांकित कंपन्यांनी दूध खरेदी सुरू केली. त्यामुळे आपोआपच स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना चांगला दूध दर मिळाला. दुधाचे संकलन वाढण्यात त्याचा लाभ झाला. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणे ऐन उन्हाळ्यामध्ये दुसऱ्यांदा लॉकडाऊनचा फटका या उद्योगाला सहन करावा लागला आहे.
लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. रेस्टॉरंट, हॉटेल्स, चहाची दुकाने, मिठाई यांनाही कुलूप लागले आहे. त्यामुळे दूध विक्रीवर वाईट परिणाम झाला आहे. दुधाची पुरवठा साखळी तुटली आहे. त्यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न सध्या भेडसावत आहे.
---
राज्यात दररोज दीड कोटी लीटर दुधाचे संकलन होते. त्यातील ९५ लाख लीटर हे लिक्विड आणि पिशवीतून विकले जाते. सध्या ही विक्री ५० लाख लीटरवर आली आहे. त्यामुळे डेअरी उद्योगाला पावडर निर्मितीकडे वळावे लागले आहे. पावडर निर्मिती करणाऱ्या कंपन्या या कमी देऊ करत आहेत.
---
दुधाचा उत्पादन खर्च २५ रुपयांवर
हिरवा चारा, भुस्सा, पेंड, कांडीचे दर वाढल्याने दूध उत्पादनाचा खर्च लीटरमागे २५ रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे हा खर्च परवडत नाही. पेंडीच्या ५० किलोच्या एका पोत्याचा दर गेल्या तीन महिन्यात १३०० रुपयांवरून १७५०वर पोहोचला आहे.
-----
लॉकडाऊनमुळे दुधाच्या उत्पादनांची विक्री तर जवळपास बंद झाली आहे. दुधाचा २५ ते ३० टक्के पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने महानंदच्या माध्यमातून अतिरिक्त दूध खरेदी योजना राबवावी. दूध उत्पादकांना त्यातून दिलासा मिळेल.
-रणजितसिंह देशमुख,
अध्यक्ष, महानंद
-----
दुधाचे उत्पादन सुरू असले तरी पुरवठा यंत्रणा मात्र लॉकडाऊनमुळे प्रभावित झाली आहे. उत्पादक, वाहतूकदार, प्रक्रिया उद्योग यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारने थेट अनुदान देऊन हा व्यवसाय सावरण्याचा प्रयत्न करावा.
- किशोर निर्मळ,
प्रभात उद्योग समूह.