अहमदनगर : कल्याणरोड परिसरातील ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांसह नगरसेवकही संतापले आहेत. रस्त्यावरून सांडपाणी वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
कल्याणरोड परिसरात नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत. नगर शहराजवळ हा भाग असल्याने या भागात निवासी संकुले दिवसेंदिवस वाढत आहेत. नगर शहराशी कल्याणरोड परिसराला जोडणारा रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग असून या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मोठे खड्डे, प्रचंड धूळ, त्यातच ड्रेनेजचे रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
गेल्या दीड वर्षांपासून या समस्या सोडविण्यासाठी या भागातील नगरसेवक शाम नळकांडे व सचिन शिंदे हे महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र, प्रत्येक वेळी आश्वासने व तात्पुरत्या उपाययोजना यामुळे या समस्या कायमस्वरूपी सुटत नसल्याने नगरसेवकही संतप्त झाले आहेत. या समस्यांमुळे या भागात दररोज छोटे-मोठे अपघात होत असून प्रचंड धूळ व ड्रेनेजचे सांडपाणी यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेने याबाबत उपाययोजना सुरू केल्या असून या सर्व समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नगरसेवक शाम नळकांडे व सचिन शिंदे यांनी दिला आहे.
----
फोटो- ०६ कल्याण रोड
फोटो ओळी - कल्याण रोडवरील खड्डे, ड्रेनेजचे रस्त्यावर वाहणारे पाणी आदी नागरी समस्यांची पाहणी करताना नगरसेवक शाम नळकांडे, सचिन शिंदे, शाखा अभियंता मनोज पारखे, सचिन लोटके आदी.