कोरोना विषाणूमुळे झालेले आजार जगभर ४० लाख लोकांचा घास घेऊनही अजून शांत झालेले नाहीत. भारतात हा आकडा आता चार लाख मृत्यूच्या आसपास पोहोचतोय. महाराष्ट्राने कालच एक लाख आकडा पार केला आहे. म्हणजे पानिपत युद्धापेक्षा जास्त.
आपल्यापैकी एकही माणूस असा नाही की ज्याच्या ओळखीच्या घरात मृत्यू झाला नाही.
अनेकांना आपल्या प्रथेप्रमाणे योग्य अंत्यसंस्कार मिळाले नाहीत.
नातेवाइकांना शोक व्यक्त करणे, शोकात सहभागी होणे आणि शोक काढणे याप्रमाणे मानसिक आधार देता आला नाही.
मानसशास्त्र सांगते की, शोक व्यक्त करायला मिळणे हे गरजेचे असते. त्याशिवाय मनाच्या जखमा भरून येत नाहीत. शोकग्रस्त व्यक्तीला त्यांच्या स्वभावाप्रमाणे शोक व्यक्त करू द्यावा. शोक दाबून टाकणे, व्यक्त करू न देणे यामुळे मनावर दूरगामी आणि घातक परिणाम होतात.
जवळच्या व्यक्तीपाशी मोकळे होणे याला पर्याय नाही.
मृत व्यक्तीची वारंवार आठवण येणे, पुन्हा पुन्हा भरून येणे, आपले काही चुकले का? राहून गेले का? कोणाचा दोष आहे?, असे विचार येणे हे नैसर्गिक आहे.
आपण मागे शिल्लक राहिल्याची खंत वाटणे हा सुद्धा शोकाचा भाग आहे.
लहान मुलांना योग्य त्या भाषेत सत्य सांगणे आणि त्यांच्या प्रश्नांना योग्य आणि खरी उत्तरे देणे योग्य आहे.
अनेकांच्या बाबतीत ही प्रक्रिया जवळजवळ वर्षभर चालते.
पहिल्या काही आठवड्यानंतर झोप आणि भूक ठिकाणावर येत नसेल किंवा दु:ख अनावर राहत असेल तर मानसोपचार तज्ज्ञ यांचा सल्ला जरूर घ्यावा.
नैसर्गिक शोकाचे रूपांतर कायमस्वरूपी उदासीनतेमध्ये होऊ नये, यासाठी समुपदेशनाची मदत शिघ्र घ्यावी.
एकमेकांना आधार देऊन नाते आणि मैत्री निभावणे ही या अवघड काळाची गरज आहे. जवळच्या व्यक्तीने मनातील विचार शांतपणे ऐकून घेणे हा सर्वांत मोठा आधार आहे.
सतत सल्ले देणे आणि सगळे ठीक होईल, अशा प्रकारची वाक्ये सतत बोलणे याने मदत कमी आणि हानी जास्त होते. भाविक स्वभाव नसलेल्या व्यक्तीला परमेश्वर, अध्यात्म वगैरे सल्ल्यांचा मनस्ताप जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे भेटायला जाताना तारतम्य बाळगावे.
- डॉ. भूषण शुक्ल, बाल-मानसोपचार तज्ज्ञ
------------