अहमदनगर: दिवाळीनिमित्ताने कपडे खरेदीसाठी कापड दुकाने गर्दीने फुलली आहेत. सरकारी नोकरदार, कंपनी कामगारांना पगार, बोनस आणि निवडणुकीत लक्ष्मीदर्शन झाल्याने सामान्यांच्या हातीही पैसा खुळखुळू लागला आहे. त्यामुळेच दिवाळी खरेदीसाठी बाजार गर्दीने फुलून गेला. सर्जेपुरापासून ते माळीवाड्यापर्यंत रस्त्याकडेला दिवाळीसाठी लागणारे साहित्य विक्रीचे स्टॉल थाटले आहेत. बाजारात प्रवेश करताच दिवाळी खरेदीला सुरूवात होते. मोठ्या दुकानासोबतच छोट्या व स्टॉलवरील साहित्यांनाही नागरिक पसंती देत आहेत. सकाळी दहा वाजेपासूनच कापड दुकाने सुरू होतात. रात्री दहा वाजेपर्यंत कापड दुकानात ग्राहक खरेदी करत आहे. दिवाळीमुळे कापड दुकानदारांनी सेल्समनचे कामाचे तास वाढविले आहेत. दिवसभरात कापड खरेदीत १ कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कापड दुकानातही नवनवीन व्हरायटीचे कपडे आले आहेत. कापड खरेदी करून शिवण्यात ग्राहकांना वेळ नाही. त्यामुळेच रेडिमेड कपड्यांना जास्त मागणी असल्याचे सांगण्यात आले. मोदी ड्रेसला लहान मुलांची जास्त पसंती आहे. दिवाळीनिमित्ताने प्रत्येक कुटुंबात लहान मुलांना नवीन कपडे घेतले जातात. लक्ष्मीपूजनासाठी घरातील लक्ष्मीला (महिलेस) नवीन साडी घेतली जाते. त्यामुळेच कापड बाजारात रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. (प्रतिनिधी)
बाजारात कोटीची दिवाळी
By admin | Updated: October 21, 2014 00:58 IST