अहमदनगर : नव्याने नियुक्ती झालेले दिलीप गावडे यांनी सोमवारी अहमदनगर महापालिका आयुक्तपदाचा पदभार मावळते आयुक्त विलास ढगे यांच्याकडून स्वीकारला. शहरात चांगले काम करायचे, असे सांगत गावडे यांनी त्यासाठी नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. गत पंधरवाड्यात गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे यांची अहमदनगर महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. महापालिकेला त्याबाबत कुठलेच आदेश नसल्याने त्यांच्या नियुक्तीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास गावडे हे महापालिकेत दाखल झाले. आयुक्त विलास ढगे यांच्याशी त्यांनी चर्चा केली व नंतर लगेचच ढगे यांच्याकडून आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. महापौर अभिषेक कळमकर यांनी नव्याने नियुक्त झालेले गावडे यांचे स्वागत केले तर मावळते आयुक्त विलास ढगे यांना निरोप दिला. सर्वांना सोबत घेऊन शहरात नवीन संकल्पना राबविण्याचा प्रयत्न केला. स्वच्छ भारत अभियानात केलेले काम राज्यात अव्वल ठरले. १ हजार २०० शौचालयांचे काम शहरात पूर्ण झाले आहे. भुयारी गटार योजनेचा नव्याने प्रस्ताव तयार करून तो शासनाला पाठविला आहे. त्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहन ढगे यांनी केले. नवनियुक्त आयुक्त गावडे म्हणाले, विलास ढगे यांनी शहरात सुरू केलेली विकास कामे पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करू. शहरात खूप चांगले काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी नागरिक, नगरसेवक, पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे. आता सांगण्यापेक्षा आपण कृती करून दाखवू, असे ते म्हणाले. महापौर कळमकर म्हणाले, महापालिका कठीण अवस्थेत असताना ढगे यांनी चांगले काम केले. मात्र, अधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य त्यांना मिळाले नाही. आयुक्त गावडे यांनी शहरातील विकास कामांना गती द्यावी. त्यासाठी त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त भालचंद्र बेहेरे, नगरसचिव मिलिंद वैद्य, नगररचनाकार रा. म. पाटील, यंत्र अभियंता परिमल निकम, अभियंता विलास सोनटक्के, श्रीकांत अनारसे, आर.जी.सातपुते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नसीम खान यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आयुक्तपदी दिलीप गावडे रुजू
By admin | Updated: May 9, 2016 23:47 IST