अहमदनगर: कोरोनामुळे केला गेलेला लॉकडाऊन, पावसाळा आणि अमृत भुयारी गटार योजनेचे रखडलेले काम, यामुळे महापालिकेची कामे थांबली होती. ही कामे आता सुरू झाली असून, विकासकामांचा धडाका सध्या शहरात सुरू आहे.
शासनाच्या जिल्हास्तर, नगरोत्थान, रस्ते विकास, दलित वस्ती सुधार योजना, दलितेत्तर आदी योजनेंतर्गत महापालिकेला मोठा निधी प्राप्त झाला होता; परंतु कोरोनामुळे लॉकडाऊन केला गेला. लॉकडाऊनच्या काळात मजुरांअभावी रस्ते व गटारीची कामे पूर्णपणे बंद होती. त्यामुळे मागील मार्च महिन्यात कामे सुरू नव्हती. ही कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत आहे. त्यामुळे ठेकेदारांनी कामे सुरू केली असून, ती वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. त्यात महापालिकेच्या चालू वर्षातील अंदाजपत्रकात प्रस्तावित असलेल्या कामांचे अंदाजपत्रक तयार करणे, निविदा प्रसिद्ध करणे, तांत्रिक मंजुरी घेऊन काम सुरू करण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. अंदाजपत्रकातील लेखाशीर्षकामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत, त्यापैकी ५० टक्के निधी खर्चालाच फक्त मंजुरी आहे. एका प्रभागात चार नगरसेवक आहेत. त्यामुळे प्रभागात अधिकाधिक कामे मंजूर करून घेण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे. प्रभागातील सर्वाधिक कामे रस्ते व गटारीची आहेत. ही कामे ठेकेदारांनी सुरू केली असून, या कामांचा शुभारंभ नगरसेवकांच्या उपस्थित होत आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये एकप्रकारे विकासकामांचा शुभारंभ करण्याची स्पर्धा सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.
...
एकाचवेळी सर्व कामे सुरू
लॉकडाऊनमुळे गेल्या मार्चपासून विकासकामे ठप्प होती. गेल्या वर्षभरापासून बंद असलेली कामे एकाचवेळी सुरू झाली असून,सध्या सर्वत्र रस्ते खाेदून ठेवण्यात आले आहेत. रस्ते व गटारींची कामे आहेत. नारळ वाढवून ही कामे सुरू करण्यात येत आहेत.